कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! आता पेन्शनमध्ये होणार कायमस्वरूपी वाढ; शासन निर्णय GR
अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर जे कर्मचारी ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त (Retaired) होतात, त्यांना लगतच्या १ जानेवारी रोजी मिळणाऱ्या वेतनवाढीपासून वंचित राहावे लागत होते. मात्र आता राज्य शासनाने अशा कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीवेतन (Pension) निश्चित करताना १ जानेवारीची ‘काल्पनिक वेतनवाढ‘ विचारात घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामुळे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये कायमस्वरूपी वाढ होणार असून, त्यांच्या हक्काचा आर्थिक लाभ त्यांना मिळणार आहे.
या निर्णयाची मूळ सुरुवात राज्याच्या वित्त विभागाने १९ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयाने झाली होती. सातव्या वेतन आयोगाच्या सुधारीत वेतन नियमांनुसार (२०१९), कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे दिनांक साधारणतः १ जुलै किंवा १ जानेवारी असे निश्चित करण्यात आले आहेत.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि केंद्र सरकारच्या २० मे २०२५ च्या कार्यालयान ज्ञापनाचा आधार घेत, शासनाने ३० जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ जुलैची काल्पनिक वेतनवाढ देण्याचा निर्णय २८ जून २०२३ च्या परिपत्रकान्वये घेतला होता.
त्याच धर्तीवर, आता ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १ जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद सातव्या वेतन आयोगात १ जानेवारी २०१६ पासून अंमलात आली असल्याने, हा नवा निर्णय देखील केंद्र शासनाच्या धर्तीवर १ जानेवारी २०१६ पासूनच पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.
वित्त विभागाच्या या निर्णयानंतर, राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा लाभ लागू करण्यात आला आहे. याबबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ जून २०२६ रोजी निर्गमित केला आहे.
या नव्या आदेशानुसार, वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना आता खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही जशाच्या तशा लागू करण्यात आल्या आहेत. आता ३१ डिसेंबरला निवृत्त होणारे १००% अनुदानित शाळांतील शिक्षकही या वेतनवाढीस पात्र ठरले आहेत. या सर्व सूचनांचे क्षेत्रिय स्तरावर तंतोतंत पालन केले जावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
एकंदरीत राज्य शासकीय कर्मचारी असोत वा १०० टक्के अनुदानित खाजगी शाळांतील शिक्षक, सर्वांनाच मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना केवळ एका दिवसाच्या तांत्रिक फरकाने वेतनवाढीचा मिळणारा लाभ आता यापुढे मिळणार आहे.
| काल्पनिक वेतनवाढ (वित्त विभाग) | शासन निर्णय डाउनलोड करा |
| काल्पनिक वेतनवाढ (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) | शासन निर्णय डाउनलोड करा |