LPG Cylinder Booking : एलपीजी बुकिंग नियमात मोठा बदल; जाणून घ्या नवीन नियम
एलपीजी बुकिंग नियमात मोठा बदल; आता प्रत्येक 25 दिवसांनी रिफिल बुकिंगची सुविधा
घरगुती एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचा बदल लागू करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, आता घरगुती एलपीजी सिलिंडरची पुढील रिफिल बुकिंग मागील सिलिंडरच्या डिलिव्हरीच्या 25 दिवसांनंतर करता येणार आहे. हा नियम देशातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही ग्राहकांसाठी तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
यापूर्वी ग्रामीण भागातील ग्राहकांना पुढील रिफिल बुकिंगसाठी 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, एलपीजी पुरवठ्यात सुधारणा झाल्यामुळे आणि प्रलंबित रिफिल बुकिंगचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने ही मर्यादा आता 45 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण ग्राहकांनाही शहरी ग्राहकांप्रमाणे समान सुविधा मिळणार आहे.
नवीन नियमानुसार 25 दिवसांचा कालावधी मागील रिफिल सिलिंडरची डिलिव्हरी झालेल्या तारखेपासून मोजला जाईल. म्हणजेच सिलिंडरची डिलिव्हरी झाल्यानंतर 25 दिवस पूर्ण होताच ग्राहक पुढील रिफिलसाठी बुकिंग करू शकतील.
या निर्णयामुळे शहरी आणि ग्रामीण ग्राहकांमधील बुकिंग अंतराचा फरक संपुष्टात आला असून, सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी समान 25 दिवसांचा नियम लागू झाला आहे. यामुळे ग्राहकांना वेळेवर रिफिल बुकिंग करता येईल आणि गॅस पुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.