Pune Crime : होणाऱ्या बायकोच्या बर्थडेचं सेलिब्रेशन, सोबत दोन जवळचे मित्र, लोहगडावर केतनच्या मृत्यूआधी काय घडलं? घटनाक्रम समोर
Pune Lohagad Trek Groom Ketan Agarwal Death : केतनची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली असून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या तरुणाचा ४०० फूट खोल दरीत कोसळल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. किल्ल्यावर सेल्फी काढत असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो घसरुन खाली पडला, गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
चौघं जण लोहगडावर
केतन विशाल अग्रवाल असं २६ वर्षीय मयत तरुणाचं नाव आहे. तो पुण्याजवळील गहुंजे येथील रहिवासी होता. केतन एका रिअल इस्टेट कंपनीत संचालक म्हणून कार्यरत होता. घटनेच्या वेळी त्याच्यासोबत होणारी पत्नी आणि दोन जवळचे मित्र होते.
जोरदार वाऱ्यांमुळे तोल गेला
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी लोहगडावर जोरदार वारे वाहत होते. सेल्फी घेताना तोल गेल्यामुळे तो खोल दरीत कोसळला. केतनची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
केतनच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. त्याचे वडील विशाल अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. गुरुवारी तीन तासांच्या परिश्रमानंतर केतनचं पार्थिव लोहगड परिसरातील घनदाट झाडीतून बाहेर काढून गडाच्या पायथ्याशी आणण्यात आलं. सायंकाळी केतनवर निगडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
केतनचा विवाह या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूरमध्ये होणार होता. तिथे १४ कोटी रुपये खर्च करुन कुटुंबीयांनी एक आलिशान महालही बुक केला होता; तसेच उदयपूरला जाण्यासाठी दोन स्वतंत्र विमानांचेही बुकिंग करण्यात आले होते.
लोहगड किल्ल्याचा इतिहास
लोहगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडीत एक महत्त्वपूर्ण किल्ला मानला जातो. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांपैकी हा एक आहे. पावसाळ्यात येथे मोठ्या संख्येने पर्यटक आणि गिर्यारोहक भेट देतात.
लोहगड पुण्यापासून ६५ किमी अंतरावर असलेला एक गिरीदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १,०३३ मीटर (३,३८९ फूट) उंचीवर वसलेला हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेचा एक भाग आहे. या किल्ल्याची निर्मिती साधारणपणे ११ व्या किंवा १२ व्या शतकात झाली असावी, असे मानले जाते.
या किल्ल्यावर यादव, निजाम, मुघल आणि मराठे अशा विविध राजवटींचे नियंत्रण होते. १६४८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६६५ च्या पुरंदरच्या तहानंतर तो मुघलांच्या ताब्यात गेला, परंतु नंतर मराठ्यांनी तो पुन्हा जिंकून घेतला.
मराठा राजवटीत या किल्ल्याचा वापर खजिना आणि महत्त्वाची सामग्री साठवण्यासाठी केला जात असे. ‘विंचू काटा’ ही येथील सर्वात प्रसिद्ध रचना आहे; ही विंचवाच्या नांगीसारखी दिसणारी एक लांब आणि खडकाळ भिंत आहे.