कंत्राटी शिक्षकांना मोठा दिलासा! शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पुन्हा सेवेत सामावून घेण्यास मंजुरी
राज्य शासनाने आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील कंत्राटी कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एकूण ५९७ कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्यांना पुन्हा मान्यता देण्यात आली असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय २७ मे २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार १८७ कला शिक्षक, २४२ क्रीडा शिक्षक आणि १६८ संगणक शिक्षक अशा एकूण ५९७ शिक्षकांना आगामी शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार आहे.
कंत्राटी शिक्षकांचा शासन निर्णय डाउनलोड करा
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांची एकूण १४९७ पदे बाह्यस्रोतांद्वारे भरण्यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ८४० शिक्षकांच्या नियुक्तींना मान्यता देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ५९७ शिक्षक सेवेत कार्यरत होते. आता याच कार्यरत शिक्षकांची नव्या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा निवड केली जाणार आहे.
या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून संबंधित शिक्षकांची पुढे काम करण्याची इच्छा तसेच त्यांच्या पूर्वीच्या कामाचे मूल्यमापन करूनच पुढील नियुक्ती दिली जाणार आहे.
या नियुक्त्या पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाच्या असतील आणि त्या प्रारंभी ११ महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील. तसेच या शिक्षकांना नियमित सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, सेवा लाभ किंवा कायमस्वरूपी नियुक्तीचा कोणताही हक्क राहणार नाही, अशी स्पष्ट अट शासनाने घातली आहे.
यासोबतच या नियुक्त्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) तसेच उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या विविध याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येणार आहेत.
दरम्यान, या ५९७ कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाचा खर्च शासनाच्या ‘आश्रमशाळा समूह’ या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीतून केला जाणार आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील कला, क्रीडा व संगणक शिक्षकांच्या कंत्राटी नियुक्तीबाबतचा अधिकृत शासन निर्णय येथे डाउनलोड करा.