राज्यात १ मेपासून जनगणना मोहीम सुरू; १ ते १५ मेदरम्यान ऑनलाइन माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राज्यात १ मेपासून जनगणना मोहीम राबविण्यात येणार आहे. दोन टप्प्यात राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत, प्रथम घरगणना केली जाणार असून कुटुंबाकडे उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांची नोंद ३३ प्रश्नांच्या माध्यमातून केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना होणार असून ती प्रक्रिया फेब्रुवारी, २०२७ मध्ये राबविली जाणार आहे. त्यात जातिनिहाय माहितीही संकलित केली जाणार आहे. या माहिती संकलनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात घरांची स्थिती, कुटुंबास उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधा आणि मालमत्ता यांची माहिती संकलित केली जाईल. राज्याच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत राज्यातील जनगणना मोहिमेची माहिती दिली. नागरिकांनी जनगणना मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून माहिती घेण्याकरिता येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जनगणना संचालनाचे उपमहानिबंधक ए. एन. राजीव व यशवंत पाटील यावेळी उपस्थित होते.
पूर्णपणे डिजिटल माध्यमातून २०२७ ची जनगणना केली जाणार आहे. यात ॲपच्या माध्यमातून नागरिकांना प्रथमच आपली माहिती (स्वगणना) भरता येईल. यात केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या ३३ विषयांशी संबंधित माहिती भरावी लागेल. एकूण १४ भाषांमध्ये ही माहिती भरता येईल. हा पर्याय ऐच्छिक असून यात सुधारणा करण्याची संधी असेल. ही प्रक्रिया १ ते १५ मे दरम्यान राबविली जाणार आहे. या माहितीच्या व्यवस्थापनासाठी http://se.census.gov.in हे संकेतस्थळ कार्यरत असेल. माहिती अवघ्या १५ ते २० मिनिटात भरता येईल. तसेच, स्वगणनेदरम्यान अॅप किंवा संकेतस्थळावर कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही, असे उपसंचालक संतोष पायस यांनी सांगितले.
त्यानंतर १५ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी जाऊन नोंदविलेल्या माहितीची पडताळणी करतील. तसेच ज्यांनी ऑनलाईन माहिती भरलेली नाही, त्यांची नव्याने नोंदणी करून माहिती भरतील. सर्व महिती सुरक्षित सर्व्हरवर संग्रहित केली जाणार आहे. माहिती गोपनीय राहवी याकरिता कठोर सायबर सुरक्षा लागू करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. डांगे यांनी दिली. महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, राजस्थान, मेघालय, झारखंड या राज्यांतील जनगणना मोहिम १ मेपासून सुरू होत आहे. इतर राज्ये त्याच्या सोयीने पुढील १५ दिवसात मोहीम सुरू करतील.
कुटुंबाचे मुख्य धान्य काय व शौचालयाचा प्रकार कोणता ?
तब्बल १५ वर्षांनी होणाऱ्या या जनगणनेत बदलांचे चित्र जनगणनेतील प्रश्नावलीत उमटलेले दिसते. उदाहणार्थ दूरध्वनीबरोबरच भ्रमणध्वनी, स्मार्ट फोट, लॅपटॉप, इंटरनेट उपलब्धता, एलपीजी-पीएनजी जोडणी अशा काही प्रश्नांचा यात समावेश करण्यात आला आहे. तसेच, प्रश्नावलीत कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणते, असा एक प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत कोणता, प्रकाशाचा मुख्य स्त्रोत त्यात राॅकेल, सौरऊर्जा, इतर तेल असा प्रश्न आहे. शौचालयाचा प्रकार कोणता. त्यात फ्लश आहे का, लादीसह खड्डा आहे की नाही, असे विचित्र प्रश्न विचारण्यात आले आहेत.
राज्यातील जनगणना दृष्टीक्षेपात :
संपूर्ण डिजिटल. http://se.census.gov.in आणि अॅपवर स्वगणनेची सोय
स्वगणना ऐच्छिक
घरोघरी जाऊन माहिती घेणारे प्रगणक – सुमारे २.६४ लाख
१४ भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा. मात्र एकदा भाषा निवडल्यास ती बदलता येणार नाही
ऑफलाईन माहिती भरण्याची सोय
गुगल मॅपच्या माध्यमातून घर, इमारतीची नोंद
परदेशस्थित, स्थलांतरित, बेघरांची नोंदणी नाही
एक कुटुंब, एक माहिती (रेकॉर्ड) याप्रमाणे माहिती. कुटुंबातील एकाच व्यक्तीला माहिती भरता येईल.
स्मार्टफोन नसेल तर काय..
जनगणनेकरिता प्रामुख्याने शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अॅपवरील नोंदणीकरिता स्वतचा भ्रमणध्वनी वापरावा लागणार आहे. त्यांना स्वतंत्र गॅझेट दिले जाणार नसल्याने ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांनी माहिती कशी घ्यायची, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय नोंदणी
पहिल्या टप्प्यात केवळ अनुसूचित जाती-जमाती आणि इतर जातींची नोंद केली जाईल. तीही केवळ कुटुंबप्रमुखांचीच असेल. पहिल्या टप्प्यातील माहितीच्या आधारे दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाईल. यात प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीविषयी सविस्तर माहिती संकलित केली जाईल. विविध लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटकांवरील माहिती यात घेतली जाईल. यात शिक्षण, स्थलांतर, प्रजनन इत्यादी विविध वैयक्तिक बाबींचा समावेश असेल. मात्र, या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून अद्याप कोणत्याच सूचना न आल्याने त्यासाठीची प्रश्नावली कालांतराने प्रसिद्ध केली जाईल.
ही माहिती संकलित होणार
घराची स्थिती, भिंतींचे, जमिनीचे, छताचे मुख्य साहित्य, घराचा व्यावसायिक वापर होतो का, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, मालकी, खोल्यांची संख्या, घरात राहणारी विवाहित जोडपी, पाण्याचा मुख्य स्त्रोत आणि उपलब्धता, प्रकाशाचा स्त्रोत, शौचालयांची प्रकार आणि उपलब्धता, सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था, न्हाणीघराचा प्रकार, एलपीजी-पीएनजी जोडणी, स्वयंपाकाचे मुख्य इंधन, रेडिओ, ट्रान्झिस्टर, ल’पटॉप, स्मार्टफोन इ. ग’झेटीची उपलब्धता, सायकल, स्कुटर, चारचाकीची उपलब्धता, सेवन केले जाणारे मुख्य धान्य.