१३ वर्षीय मुलाचे थरारक धाडस! बिबट्याची मान पकडून वाचवला स्वतःचा जीव; व्हिडिओ व्हायरल
मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील पिपरिया परिसरात एका १३ वर्षीय मुलाने दाखवलेल्या धाडसाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. सत्यम ठाकूर या मुलावर शनिवारी संध्याकाळी तेंदुआने अचानक हल्ला केला. मात्र प्रसंगावधान राखत सत्यमने तेंदुआची मान पकडून त्याला दूर ढकलले आणि स्वतःचा जीव वाचवला.
ही घटना पिपरिया फॉरेस्ट बीट अंतर्गत येणाऱ्या कुर्सी खापा गावाजवळ घडली. आठवीत शिकणारा सत्यम शेतातील विहिरीजवळ खेळत होता. त्याच वेळी झुडपातून अचानक तेंदुआ बाहेर आला आणि त्याच्यावर झडप घातली. तेंदुआच्या नखांनी सत्यमच्या पोट, हात आणि पायाला जखमा झाल्या. तरीही घाबरून न जाता त्याने तेंदुआची मान पकडून त्याला मागे ढकलले.
सत्यमच्या आरडाओरडीनंतर त्याचे वडील महेंद्रसिंह ठाकूर आणि गावकरी तातडीने घटनास्थळी धावून आले. सर्वांनी आरडाओरडा करत काठ्या घेऊन तेंदुआला हुसकावून लावले. त्यामुळे तेंदुआ जंगलाच्या दिशेने पळून गेला. मुलाच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
जखमी सत्यमला वनविभागाच्या वाहनातून तातडीने पिपरिया येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. वनविभागाकडून उपचारासाठी आर्थिक मदतही देण्यात आली आहे.