शासकीय कर्मचाऱ्यांचा सण-उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी

शासकीय कर्मचाऱ्यांचा सण-उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी

राज्यातील शासकीय गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचाऱ्यांना सण-उत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या अग्रिम रकमेत वाढ करून ती १२,५०० रुपयांवरून थेट २५,००० रुपये करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी शासनाकडे केली आहे. या मागणीमुळे राज्यातील हजारो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांना निवेदन सादर करून सध्याची उत्सव अग्रिम मर्यादा वाढविण्याची विनंती केली आहे. तसेच या निवेदनाची प्रत वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

महासंघाच्या निवेदनानुसार, शासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय सण, धार्मिक उत्सव आणि विशेषतः दिवाळीसारख्या मोठ्या सणांच्या खर्चासाठी उत्सव अग्रिम दिला जातो. मात्र, १२,५०० रुपयांची मर्यादा अनेक वर्षांपासून कायम असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम अपुरी ठरत आहे. घरगुती खर्च, सणासुदीची खरेदी, मुलांचे साहित्य, कपडे आणि इतर आवश्यक खर्च भागविण्यासाठी अधिक निधीची गरज भासत असल्याचे महासंघाने नमूद केले आहे.

दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने या काळात कर्मचाऱ्यांवर आर्थिक भार वाढतो. महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असून सध्याच्या अग्रिम रकमेत आवश्यक खर्च भागविणे कठीण होत असल्याचा दावा महासंघाने केला आहे. त्यामुळे उत्सव अग्रिमाची मर्यादा २५,००० रुपये करण्यात यावी, अशी ठाम भूमिका महासंघाने मांडली आहे.

महासंघाच्या माहितीनुसार, शासनातील सुमारे ९० टक्के कर्मचारी दिवाळी उत्सवासाठी उत्सव अग्रिमाचा लाभ घेतात. त्यामुळे आगामी दिवाळीपूर्वीच या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन वाढीव अग्रिम मंजूर करावे, अशी विनंती शासनाकडे करण्यात आली आहे.

आता वित्त विभाग आणि राज्य शासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे राज्यातील गट-ड कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष लागले आहे. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास हजारो कर्मचाऱ्यांना आगामी सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

Leave a Comment