Pm kisan: पीएम किसान योजनेचा ₹2000 हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्त्याची रक्कम जमा करणार आहेत. या माध्यमातून देशभरातील 9.44 कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये थेट जमा केले जाणार आहेत. केंद्र सरकारकडून यासाठी तब्बल 18,880 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार असून ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवली जाईल.
पश्चिम बंगालमधून होणार निधी वितरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे आयोजित कार्यक्रमातून दुपारी सुमारे 3.45 वाजता या निधीचे वितरण करणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील 45.35 लाख शेतकऱ्यांना सुमारे 907 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. या वितरणानंतर पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत मिळालेली एकूण रक्कम 15,055 कोटी रुपयांवर पोहोचेल.
देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. या हप्त्यानंतर देशातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली एकूण रक्कम सुमारे 4.46 लाख कोटी रुपयांवर जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
पीक विमा योजनांनाही मिळणार चालना
पीएम किसान निधी वितरणासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) आणि पुनर्गठित हवामान आधारित पीक विमा योजना (RWBCIS) यांच्याशी संबंधित उपक्रमांचीही सुरुवात करणार आहेत. या योजनांसाठी केंद्र सरकारने सुमारे 12,200 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले असून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील बदलांपासून संरक्षण देण्याचा उद्देश आहे.
ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक
पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पात्र शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ओटीपीच्या माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करू शकतात. तसेच जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी देखील करता येते. सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत दिली आहे.
बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशनची सुविधा
शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना मिळतो लाभ?
महाराष्ट्र राज्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे 90 लाख 95 हजार 39 इतकी आहे. या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसह राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही लाभ मिळतो. त्यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत अधिक प्रमाणात मिळत आहे.
वर्षाला मिळतात 6,000 रुपये
केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. साधारणपणे प्रत्येक हप्त्यामध्ये चार महिन्यांचे अंतर ठेवले जाते. या योजनेमुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक आधार मिळत आहे.